पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी १७ डिसेंबर २०२१ रोजी भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी घेतला होता. यात माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांचा समावेश होता. या सगळ्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वी देखील दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. अजून दोघांच्या प्रवेशाची शक्यता आहे.
शहरात पालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादीला खिंडार पडले. भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी खडसेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवेशावेळीआमदार संजय सावकारेंनी त्यांचे स्वागत केले.
२०१६ च्या निवडणुकीत अजय नागराणी तसेच भाजपकडून निवडून आलेल्या ९ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. यामुळे भाजपच्या तक्रारीनुसार या नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. त्यास नगरसेवकांनी खंडपीठात आव्हान दिले होते. आता पुन्हा या नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. आगामी काळातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सह एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.