देशातील २७ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीतील महत्वाचे मुद्दे, इंडियाचं जागावाटप, लोकसभा निवडणुकीची विरोधी पक्षांची रणनीती अशा महत्त्वाच्या प्रश्नांना संजय राऊत यांनी उत्तरं दिली.
मागील चार वर्षांपूर्वी पुलवामा हल्ला झाला नव्हता तर केला होता, असा दावा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला होता. गोध्राबाबतही असेच दावे केले गेले होते. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून विशिष्ट भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भीती आम्हा सर्व विरोधी पक्षांच्या लोकांच्या मनात आहे. आम्ही या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच उद्याच्या होणाऱ्या बैठकीत या विषयावर आमच्यात चर्चा होईल, असं राऊत म्हणाले.
आमच्या दृष्टीने बाबरी आणि अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. असले मुद्दे काढणारे मुर्ख लोक आहे. न्यायालयाने हा मुद्दा संपवला आहे. तो मुद्दा संपला म्हणूनच तिकडे राम मंदिर होतंय. त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये. श्रेय घ्यायचं असेल तर जे हजारो कारसेवक मारले गेले, त्यांना द्यावं लागेल, त्यात मग शिवसेनेचा सहभाग आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आयेगा तो मोदी नही, जाऐगा तो मोदीही
विरोधी पक्षाच्या एकजुटीमुळे देशातील वातावरण बदलतंय. आपल्याला आयेगा तो मोदी अशी घोषणा सांगितली गेली. पण आता ती घोषणा चालणार नाही. कारण आता जाएगा तो मोदीही… असा दावाच संजय राऊत यांनी केला.