मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे एकाच वेळी उघडल्यामुळे धरणालगत असणाऱ्या सिंभोरा, भांबोरा, येवती या गावातील शेतकऱ्यांची १०० एकराच्या वर शेती दरवर्षी पाण्याखाली येऊन शेतीचे बांध, वहिवाटीचे मार्ग, विहीर, मोटार पंप, तसेच कपाशी सोयाबीन, संत्रा, मोसंबी या पिकांचे पूर्णतः नुकसान होते. याबाबत शेतकऱ्यांचा मागील १५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. गेले अनेक दिवस याविषयी आंदोलनही सुरू होतं. परंतु त्याची कुणीही दखल घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट मंत्रालय गाठलं.
मंत्रालयात नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांना मागील १५ वर्षांपासूनची नुकसानभरपाई व या जमिनीचे भूसंपादन करून द्यावे, या मागणी करता शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण शासनाने डोळेझाक केली. त्यामुळे धरणग्रस्तांनी आज पुढचं पाऊल म्हणून थेट मंत्रालयातच आंदोलन केलं. दुपारी पावणे तीनच्या सुमारास २० ते २५ आंदोलकांनी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारून आम्हाला न्याय द्या… न्याय द्या, अशी घोषणाबाजी केली. संबंधित प्रकार नेमका काय होतोय, याची लगोलग कुणाला कल्पना आली नाही. परंतु झाल्या प्रकाराने मंत्रालयात धावपळ सुरू झाली. मंत्रालयात असेलल्या मंत्र्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले होते.