स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी – महासंवाद

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी – महासंवाद

पुणे, दि.23: श्री क्षेत्र तुळापूर येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर (ता. हवेली)  येथील बलिदान स्थळ विकास कामांची त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तुळापूरच्या सरपंच ॲड. गुंफा इंगळे, वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,  छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) विकास आराखडा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील  एकूण 264 कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनस्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजूरी देण्यात येईल.  या कामांचे सविस्तर  आराखडे व अंदाजपत्रक तयार करुन निविदा काढण्याची कार्यवाही करावी.

नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी श्री. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बु. (ता. शिरुर) स्मारक विकास आराखड्याबाबत माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मुख्य अभियंता श्री. चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. बहीर आणि कार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.

****

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here