-
महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ
-
नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच
-
नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी
-
नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ हजार गावे आत्मनिर्भर करणार
-
नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार
-
नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी
-
नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी
-
नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार
-
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी
-
नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून ७३ शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार
-
नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियानातुन ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा
-
छत्रपती संभाजी नगर, दि. १७ सप्टेंबर (विमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारत देशाचा गौरव व सन्मान वाढविला आहे. जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. जी 20 ची परिषद राज्यातील अनेक शहरांमध्ये झाली. आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती इतर देशापर्यंत पोहोचविण्याची संधी या परिषदांच्या माध्यमातुन मिळाली. दिल्ली येथे झालेल्या जी 20 च्या बैठकीत प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयांना, ठरावांना विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांनी एकमुखाने संमती दिली. ‘वसुधैव कुटूंबकम’ हा आपला मुलमंत्र आहे. सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास या ठरावावरही एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नमो महिला सशक्तीकरण अभियान
नमो ११ कलमी कार्यक्रमात नमो “महिला सशक्तीकरण अभियान” राबविण्यात येणार असुन ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यासोबतच २० लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत ५ लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, ५ लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल तसेच 3 लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नमो कामगार कल्याण अभियान
भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून “नमो कामगार कल्याण अभियान” अंतर्गत ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नमो शेततळी अभियान
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार असुन पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब अन् थेंब याद्वारे साठविण्यात येणार आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच याच शेततळयातून मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.
नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान
“नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान” राबविण्यात येऊन 73 हजार आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार आहेत. बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधुन देणे, घरांमध्ये शौचालय बांधुन त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे, गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे, महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व साह्य, सेंद्रिय उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठ, उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, उत्पादंनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान
गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी “नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान” राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना पक्की घरे बांधुन देण्यात येणार आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी, घरांमध्ये वीज पुरवठा, समाज प्रबोधनाचे काम व्हावे यासाठी समाज मंदिराची उभारणी, गरीब व मागासवर्गीय महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठीही या अभियानातुन मदत करण्यात येणार आहे.
नमो ग्राम सचिवालय अभियान
“नमो ग्राम सचिवालय अभियान” राबवुन प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. सव ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा देण्यात येणार असुन संपुर्ण गावाचे नियंत्रण कक्षाची उभारणीही याद्वारे करण्यात येणार आहे.
नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान
“नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान” राबवुन आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करण्याबरोबरच 73 विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहेत. आधुनिक संसाधनयुक्त शाळांच्या उभारणी, वेगवान इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण, अंतराळविषयक व विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत मार्गदर्शन, महत्वांच्या शोधांबाबत माहिती, प्रशिक्षण वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा तसेच अंतराळ दर्शन आदी सुविधा या शाळांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नमो दिव्यांग शक्ती अभियान
नमो दिव्यांग शक्ती अभियान राबविण्यात येऊन याद्वारे दिव्यांग पुनर्वसन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. अभियान स्वरुपात दिव्यांगांचे सर्व्हेक्षण व ओळख निश्चित करण्यात येणार आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज देण्याबरोबरच दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे या अभियानातुन समुपदेशन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान राबवुन यातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी करण्यात येणार आहे. यातुन खेळाडुंना मैदानी क्रीडा सुविधा देण्याबरोबरच खेळाडुंचे समुपदेशन करुन त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.
नमो शहर सौंदर्यीकरण अभियान
“नमो शहर सौंदर्यीकरण अभियान” राबवुन ७३ ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातुन सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान
“नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान” राबवुन ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण व स्वच्छता आदी कामे या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.