लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर

लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर

नागपूर, दि. 15: पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे सचिव विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते.

लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायपालिका व माध्यम हे चार स्तंभ असल्याचे सांगून आमदार श्री. दरेकर म्हणाले, राजकीय प्रणालीमध्ये निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्ष संघटन महत्वाची भूमिका पार पाडते. ज्या पक्षाचे संघटन मजबूत त्या पक्षाला चांगले यश प्राप्त होते. कार्पोरेट क्षेत्रामध्येही संघटन असते. ज्या कार्पोरेट क्षेत्राचे संघटन मजबूत आहे ते क्षेत्र चांगली प्रगती करते. संघटनामध्ये मोठी ताकद असते. एखाद्या मुद्यावर नागरिक संघटितपणे रस्त्यावर उतरले तर त्याची दखल शासनासही घ्यावी लागते, इतकी संघटनामध्ये ताकद असते. राजकीय पक्षांमध्येही असेच असते. ज्या पक्षाचे संघटन मजबूत तो पक्ष चांगली कामगिरी करत असतो. संघटनामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांचा समावेश असतो. संघटनाचे विविध भाग असतात. त्यामध्ये ग्राम, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्र असे टप्पे असतात. या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावरील विचार, ध्येय ही तालुका, ग्रामस्तरापर्यंत पोहचवले जातात. यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची असल्याचेही श्री. दरेकर म्हणाले.

पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यासाठी संघटन महत्वाचे असते. या संघटनाच्या माध्यमातून पक्षाचा विचार पोहचवून त्यातून विकास कार्य करणे महत्वाचे आहे. देशात अनेक पक्ष आहेत. काही पक्ष राज्यांपुरतेच मर्यादीत असतात. तर काही राष्ट्रीय पातळीवर काम करत असतात. हे काम करत असताना ज्या पक्षाचे संघटन मजबूत आहे त्या पक्षाचे विचार मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचतात. काही पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. अशा पक्षांचा ऱ्हास होतो. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी पक्षाचे विचार टिकवावे लागतात. ते जनतेपर्यंत पोहोचवावे लागतात. यासाठी संघटन अत्यंत महत्वाचे आहे. पक्ष संघटन मजबूत असेल तर पक्षाने घेतलेले निर्णय योग्य ठरतात. अनेकवेळा निवडणूक जिंकलेला उमेदवार जरी बदलला तरी त्या मतदारसंघात पक्षाने दिलेला उमेदवार निवडून येऊ शकतो. पक्ष संघटना मजबूत असेल तर हे सहज शक्य होते. त्यामुळे पक्ष संघटनेला अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन श्री. दरेकर यांनी केले.

जे कार्यकर्ते संघटनेच्या माध्यमातून काम करतात त्यांना नेत्यांपेक्षाही चांगले यश मिळत असल्याचे दिसते. सध्या लोकांना केंद्र शासनाच्या योजनांची, ध्येय धोरणांची माहिती व्हावी यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवण्यात येत आहे. अशा उपक्रमांव्दारे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन महत्वाचे असते. कार्यकर्त्यांचे संघटन चांगले असेल तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. कार्यकर्त्यांच्या संघटनामुळेच अशा उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढत असतो. त्यामुळे पक्षाने व्यक्ती केंद्रीत न राहता संघटन केंद्रीत राहिले पाहिजे. विविध पक्षांचा बालेकिल्ला असे ज्यावेळी म्हटले जात असते. त्यावेळी त्याठिकाणी त्या त्या पक्षांचे संघटन मजबूत असते. प्रत्येक पक्षाची संघटना बांधणी वेगळी असते. पण, साधारणपणे ढाचा एकच असतो, असेही श्री. दरेकर यांनी सांगितले.

सध्याच्या काळात समाजामध्ये प्रगल्भता वाढत आहे. त्यामुळे एकाच घरातील वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतात. मतदान कोणाला करावे हा त्यांचा अधिकार आणि त्यांची भूमिका आहे. पण, त्याचवेळी संघटनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना पक्षाची भूमिका समजून सांगता येते. त्यासाठी पन्ना प्रमुख, वॉर्ड प्रमुख अशा कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपलेली असते. या सर्व बाबींचा विचार करता आजच्या युवकांनी संघटना बांधणी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे आणि संघटन बांधणीच्या माध्यमातून देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा विद्यार्थी राकेश देवगडे यांनी आभार मानले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/ससं

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here