विदर्भाचा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष दूर करणार – मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार- महासंवाद

विदर्भाचा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष दूर करणार – मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार- महासंवाद

नागपूर,दि. १४ : राज्यातील सर्वाधिक तलाव विदर्भात आहेत. मात्र, त्या तुलनेत मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष विदर्भातच जास्त आहे. हा अनुशेष तातडीने दूर करून विदर्भात मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आढावा बैठकीत दिली.

 सेमिनरी हिल्स येथील हरी सिंह सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा जलाशय येथे भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.

 मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा विचार करता अमरावतीमध्ये ४४, छत्रपती संभाजीनगर ४८, लातूर ४५ अशा मत्स्य संवर्धन प्रकल्पांची संख्या आहेत. एकूणच महाराष्ट्राचा विचार करता विदर्भात ही संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे विदर्भातील हा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. हा अनुशेष दूर करीत अधिकाधिक मत्स्यसंवर्धन प्रकल्पांची तरतूद विदर्भासाठी करीत अनुशेष भरून काढला जाईल, असे मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.

 पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते. सर्वसामान्यांपर्यंत या अनुदानाचा लाभ पोहोचण्याची गरज आहे. मत्स्यसंवर्धनाच्या योजनेला गती देत विविध प्रकारच्या नव्या तरतुदींचा अंतर्भाव या योजनेत करण्यात येण्याची गरज असल्याचेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

 बैठकीला आमदार मदन येरावार, मत्स्य  विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित  होते.

 जिवती येथील संयुक्त मोजणीच्या कामांना गती द्या

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील विविध समस्या व पट्टे वाटपसंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, जिवतीचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी एका उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, पट्टे वाटप संदर्भातील निर्वणीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात यावा, पट्टे वाटप संदर्भातील तीन पिढ्यांची अट काढण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, जमीन मोजणीच्या संयुक्त कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत दिले.

 बैठकीला आमदार सुभाष धोटे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक  डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here