नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि. १४ (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्व्हेक्षण करून त्याच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार नोंद घेवून उपचार व प्रमाणपत्र देण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

पालकमंत्री डॉ. गावित जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्व्हेक्षणासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका पंचायत पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, शासनाने समाज कल्याण विभागांतर्गत ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून येत्या काळात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांचे स्क्रिनिंग करून त्यांच्या दिव्यंगत्वाच्या प्रकारानुसार नोंद घेतली जाईल व पुढील उपचाराची दिशा निश्चित करून ज्या बांधवांवर शस्रक्रिया करण्याची गरज आहे, त्यांच्यावर याच वर्षी उपचार केले जातील. तसेच त्यांना तात्काळ त्यांच्या दिव्यंगत्वाच्या प्रकारानुसार उपचारही केले जातील. दिव्यांग व्यक्तींना कायद्याने समान संधी व हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. अशा प्रदान करण्यात आलेल्या समान संधी व हक्कांच्या आधारे दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व स्वः उत्थानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास तसेच सामान्य व्यक्तींप्रमाणे सुसह्य जीवन जगण्यासाठी योग्य अशा संधी उपलब्ध करुन देणेबाबतची तरतुद केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्याचे दिव्यांग धोरण अंमलात आणलेले आहे. यापूर्वी अस्तिवात असलेला अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम, १९९५ अधिक्रमित करण्यात आला असल्याने सदर कायद्यातील तरतुदीनुसार दिव्यांगत्वाचे एकूण ०७ प्रवर्गासह दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये दिव्यांगत्वाच्या एकूण २१ प्रवर्गांचा समावेश करण्यात आला असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, सिकलसेल आजाराबाबतचेही स्क्रिनिंग करून दिव्यांगांसह सिकलसेल बाधितांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्यावर आधारित रोजगार निर्मिती व  हस्तव्यवसायाला प्रोत्साहन देवून त्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यावरही भर देण्यात येईल.

या  २१ प्रकारच्या दिव्यांगांचे होणार सर्व्हेक्षण

अस्थिव्यंग, कुष्ठरोग निवारित/ मुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारिरीक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पिडीत, पूर्णत: अंध, अंशत: अंध, ऐकू कमी येणे, वाचा / भाषा दोष, बौद्धीक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्न, मानसिक वर्तन / मानसिक आजार, हातापायांतील स्नायू कमजोर / शिथिल होणे, कंपवात, अधिक रक्तस्त्राव, रक्ताची कमतरता, रक्ताचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, बहुविकलांग या आजारांचे सर्व्हेक्षण होणार आहे.

०००

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here