मुंबई, दि १४ : प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. त्याला वाट करुन देण्यासाठी एखादी छोटी संधीही पुरेशी असते. याचाच अनुभव आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आला. प्रशासनाचा भार सांभाळणारे मुख्य सचिव मनोज सौनिक आणि गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही पर्यावरणपूरक गणपती रंगवून त्यांच्यातील दडलेल्या कलाकाराचे दर्शन घडविले. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी केले.
…प्रसंग होता, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगशाळेचे. या कार्यशाळेत उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक डॉ.राजेंद्र निंबाळकर, उद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार यांनीही सहभाग घेऊन गणपती रंगवण्याचा आनंद लुटला.
श्री गणरायाला १४ विद्या आणि ६४ कलांचे अधिपती मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. हा गणेशोत्सव पर्यावरणाला पूरक व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मातीच्या गणपतीला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. यासाठीच मंत्रालयात आयोजित कार्यशाळेत सहभागी होत मुख्य सचिवांनी निसर्गाशी अनुरुप होत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. त्यांनी खादी व ग्रमोद्योग मंडळ आणि हातकागद संस्थांमधील कर्मचाऱ्यांसोबत तन्मयतेने गणपती रंगवण्याचा आनंद घेतला.
हातकागद संस्था पुणे यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि पेस्टल रंग रंगकाम करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते.
०००
मनीषा सावळे/विसंअ/