आज पुण्यात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ‘जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांचा दावा आपण पहिला असेल तर असंच दिसत कदाचित त्यांना निवडणूक आयोगाने कबुल केलेलं दिसत आहे की, पक्षचिन्ह आणि नाव त्यांच्याकडे जाणार. जर निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झाला असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच जर राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं तर महाराष्ट्राची जनता ते माफ करणार नाही, मोठ्या रोषाला भाजपला सामोरं जावं लागेल.’ जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह शरद पवारांच्या हातातून जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता त्याचप्रमाणे अजित पवार यांनी सुद्धा आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असा दावा केला आहे. तसेच आपल्याला सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जर हे प्रकरण भविष्यात निवडणूक आयोगाकडे गेल्यास शिवसेना पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग वरील बाबी तपासू शकतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खरा अधिकार कुणाचा आहे, याचा निकाल देऊ शकतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव देखील शिवसेनेप्रमाणेच फुटीर गटाला मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.