या प्रकरणात आठ पथके तपास करीत असून, दोन पथके अजूनही परराज्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान, पारख यांचे अपहरण कोणी आणि कशासाठी केले होते, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांना प्राप्त झालेली नाही. इंदिरानगरमधील निवासस्थानाबाहेरून शनिवारी (दि. २) रात्री हेमंत पारख (वय ५१) यांचे अपहरण करण्यात आले, तर रविवारी (दि. ३) आठ तासांनंतर पारख यांना सोडून अपहरणकर्ते पसार झाले. त्यानंतर पोलिस व कुटुंबीयांच्या मदतीने पारख सुखरूप घरी परतले. या प्रकरणाची नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
इंदिरानगर पोलिसांत दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास विविध आठ पथके करीत आहेत. मात्र, यापैकी एकाही पथकाला अपहरण कोणी आणि कशासाठी केले होते, याबाबतची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, गुजरातमधील एका वेअरहाऊसच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील वादातून अपहरणासह आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. परंतु, पोलिसांच्या तपासात याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशननुसार पोलिस संशयितांचा माग काढत आहेत.
सोमवारी दिवसभर पोलिसांनी पारख यांच्यासह कुटुंबातील अनेकांशी चर्चा केली. पारख यांचा सविस्तर जबाब नोंदवूनही त्यातून महत्त्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे गुन्हे पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन उपायुक्त, दोन सहायक आयुक्तांसह पाच-सहा वरिष्ठ निरीक्षकांची पथके संशयितांचा माग काढत आहेत.
दरम्यान, हेमंत पारख हे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गजरा ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांचं इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केल्यानं नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. ही घटना शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास घडली होती. आता नाशिक पोलीस या प्रकरणाचं गूढ कधी उलगडणार याकडे लक्ष लागलं आहे.