डॉ. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख (डॉ. सी.डी. देशमुख) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या प्रस्तावित वनउद्यानाच्या आराखड्याचे वन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील जामगाव (ता. रोहा) येथे डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (व्हिसीद्वारे), रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (व्हिसीद्वारे) मुख्य वनसंरक्षक ठाणे के. प्रदिपा, रोहा-रायगडचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक, वनस्पती शास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या या थोर सुपूत्राच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या औचित्याने त्यांच्या नावाने रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. त्यांची स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या वनउद्यानाची उभारणी त्यांच्या नावाला आणि कर्तृत्वाला साजेशी करण्यात यावी, त्यासाठी दर्जेदार आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.  पवार यांनी दिले.

*****

वंदना थोरात/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here