मुंबई, दि. २८ :- महान हॉकीपटू, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रातील मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीचं, योगदानाचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून आपण साजरी करतो. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या मैदानात भारतासाठी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने सन 1928, 1932 आणि 1936 असे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या खेळाची जादू अनेक दशकानंतर आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. केंद्र सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन भारतीय क्रीडा जगतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमीका नेहमीच घेतली आहे. स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज (२८ ऑगस्ट) पुणे येथे झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रोख रक्कमांमध्ये भरीव वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळांच्या प्रसार-प्रचारासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, हीच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना व्यक्त करुन राज्यासह देशातल्या खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ते, हितचिंतकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
000