बाजारात भाव मात्र शेतकऱ्याकडे माल नाही
बाजारामध्ये सध्या तूर आणि हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती. बाजारात हरभऱ्याला भाव नव्हता हमीभाव केंद्रावर उत्तम भाव होता या कारणासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या हरभरा हमीभाव केंद्र ला विकला. भारतात एकूण ९५ लाख मॅट्रिक टन हरभराचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ३० लाख मॅट्रिक टन हरभरा ची खरेदी सरकारने केली आहे. तुरीला आणि हरभऱ्याला आता बाजारभाव उत्तम मिळत असला तरी शेतकऱ्याकडे मालच नसल्याने आवक अत्यल्प आहे.
रोज बदलणाऱ्या भावामुळे किरकोळ व्यापारी हैराण
तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ याचे दर दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात माल विकतही नाहीत. रोज बदलणाऱ्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय.
भाव कमी होण्याची चिन्ह नाहीत
गेल्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड, अनियमित पाऊसमान याचा डाळीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रसह इतर राज्यातही पावसानं दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला आहे. पाऊस पडेल आणि उत्पादन चांगले येईल अशी स्थिती आता राहिली नाही. पावसानं दिलेल्या ओढ याच्यामुळे उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. पुढील हंगामातच उत्पादनाची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या डाळीची भाव वाढ झाल्याचं बोलले जात आहे.