‘मुक्तीसंग्रामा’चा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा- विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड

‘मुक्तीसंग्रामा’चा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा- विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड

औरंगाबाद, दि.26,(जिमाका)– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभानिमित्त संपूर्ण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. विभागातील आठही जिल्ह्यात यानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या  प्रेरणादायीस्मृतींना उजळा देऊन हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, उपायुक्त सुरेश बेदमुथा, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर,  जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांच्यासह सर्व विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात साजरा करावा. नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाची शौर्यगाथा माहिती व्हावी हा हेतू या समारंभांचा असावा. आरोग्य शिबिर ,स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, राष्ट्रगीत ,राज्यगीत आणि मराठवाडा गीत गायन अशा स्वरुपात कार्यक्रमांचे आयोजन व्हावे.   तसेच या कालावधीत व्याख्यानमाला, काव्यवाचन, कवी संमेलन,मराठवाडा मुक्तीसंग्राम माहितीपट दाखवावा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा, पोलीस परेड, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखतींचे प्रसारण, असे उपक्रम राबवावे. शासन समितीने केलेल्या सुचनेनुसार मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबवावे. या उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना शासकीय संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग  घेण्यात यावा. वृक्ष लागवड, पथनाट्य त्याचप्रमाणे हुतात्मा स्मारकांचे तसेच सर्व शहरांमधील स्मृतीस्थळे आदींचे सुशोभिकरण यासारख्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्राम ही संकल्पना आणि इतिहास हा जनतेसमोर मांडवा, असेही यावेळी विभागीय आयुक्त यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी  सांगितले की, कृषी जलसंधारण, पशुसंवर्धन या विभागाने कृषी क्षेत्रामध्ये शेतीस पूरक असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त दुष्काळ मुक्ती ही संकल्पना राबवावी. तसेच नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाचे उपक्रम आरोग्य संस्थांनी राबवावे,असे निर्देश त्यांनी दिले.

00000

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here