शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, दि. १६ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच यशस्वीतेसाठी स्वयंशिस्त यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती  सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्विस कॉलेज येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते.

यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, विविध विभागांचे अधिष्ठाता प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षान्त समारंभात सहभागी होणे अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद असल्याचे सांगत सर्व पदवीधर, पदक विजेते आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाने नुकतीच आपली शतकपूर्ती साजरी केली असून राष्ट्रनिर्माण कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे शतकभरात अनेक प्रख्यात माजी विद्यार्थी घडविले असल्याचे राज्यपाल म्हणाले.

विद्यापीठाने मध्य भारतातील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणाचे धडे दिल्याचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर टाकल्यास लक्षात येते. आदर्श नेते, महान तंत्रज्ञ, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, उत्कृष्ट कलाकार, महान शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगली माणसं तयार करण्याचे कार्य विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाने आपल्या शतकपूर्तीनिमित्त भारतीय विज्ञान काँग्रेस, भारतीय औषधशास्त्र विज्ञान काँग्रेस, राज्यस्तरीय नेतृत्व गुण विकास कार्यक्रम यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. विद्यापीठाने दाखवलेली संशोधनाची दिशा देखील प्रशंसा करण्याजोगी आहे आणि विद्यापीठातील तरुण संशोधकांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, विशेषत: स्थानिक समुदायाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, जागतिक नेते बनण्याच्या मार्गावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @ २०४७’ या महत्त्वाकांक्षी मिशनच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठेवणारे हे धोरण असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यावेळी म्हणाले.

स्वागतपर भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.

पुरस्कारांचे वितरण

एनएमडी महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थिनी प्रगती रमेश छतवानी यांना ६ सुवर्ण पदके, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी रूपाली केवलराम देशपांडे यांना ४ सूवर्ण पदके व १ पारितोषिक, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी नूतन पांडुरंग इंगोले यांना ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक तसेच डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी अजय सुखदेव नरांजे यांनी एमए (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक, विद्यापीठ जनसंवाद विभागातील तेजस अतुल पाटील याने ३ सुवर्णपदक व एक पारितोषिक, विद्यापीठ पदव्युत्तर गृहविज्ञान विभागातील दिव्या अनिल पैतोड हिला ४ सुवर्ण पदके देऊन गौरविण्यात आले. श्री बिंजानी सिटी कॉलेज नागपूर येथील केदार विश्वनाथ खोब्रागडे ४ सुवर्णपदक तर विद्यापीठाची वयाच्या ६५ व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल योगतज्ञ डॉ. विठ्ठलराव जिपकाटे पारितोषिक रामदास बुचे यांना प्रदान करण्यात आले.

१ लाख ३ हजार ३०३ विद्यार्थ्यांना पदवी वितरण

दीक्षान्त समारंभात १,०३,३०३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये स्नातक पदवीधर ८४,३१० विद्यार्थी तर स्नातकोत्तर पदवीधर १८,७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदवीकांक्षींची (डिग्री सर्टिफिकेट) विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – ३७,९६७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – २५,१४१, मानव विज्ञान विद्याशाखा – २४,१६०, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – ८,५२२, स्वायत्त महाविद्यालये – ६,७५८, पदविका प्रमाणपत्र -७५५

आचार्य पदवी प्रदान

या दीक्षान्त समारंभात विद्या शाखा निहाय २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ९०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ५२, मानवविज्ञान विद्याशाखेत ६९, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १० आदींचा समावेश आहे. तसेच १ विद्यार्थी एम.आर्च. (बाय रिसर्च) या पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here