गडचिरोली : पावसात छत गळू लागल्याने एसटीच्या चालकाने एका हातात छत्री घेऊन बस चालविल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बस अहेरी आगारातील असल्याची चर्चा आहे. यापूर्वी छप्पर उडाल्यानंतरही काही किलोमीटर बस धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
चौकशीनंतर दोषी एसटी महामंडळाच्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. हा वाद थांबण्यापूर्वीच आता नवा व्हिडीओ पुढे आला आहे. पावसामुळे बसच्या छताला गळती लागली. पावसाळ्याच्या दिवसांतील नेहमीचा हा अनुभव असल्याने या चालकाने लगेच हातात छत्री घेतली आणि दुसऱ्या हाताने बस चालवू लागला.
कुठल्याही चिंतेविना ही बस तो पुढे नेत आहे. बसमध्ये प्रवासी असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत नसले तरी हा जीवघेणा प्रवास असल्याचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. या व्हिडीओमुळे गडचिरोली जिल्ह्यातील एसटीच्या भंगार बसेसचा विषय चर्चेला आला आहे.