सिग्लन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं पनवेल-सीएसएमटी दरम्यान जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक कोलमडली आहे. साडे नऊच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी निघालेल्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. पनवेल-सीएसएमटी च्या दिशेने एकही गाडी जात नव्हती त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला. पनवेल कडून येणाऱ्या सर्व गाड्या जुईनगर स्थानकातच उभ्या होत्या. त्यामुळे संपूर्ण जुईनगर परिसरामध्ये प्रचंड गर्दी निर्माण झाली होती.
रात्री ९ वाजून २१ मिनिटांपासून जुईंनगर, रेल्वे स्थानकात अनेक गाड्या उभ्या होत्या. तसेच पनवेल ला जाणाऱ्या गाड्या देखील मध्येच उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांना अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ लोकल मध्ये अडकून पडल्यासारखे झाले. त्यात अनेक प्रवाशांना लोकलला काय झाले हे माहिती नसल्यामुळे अनेक जण कुर्ल्या मध्ये काहीतरी झाले असावे,किंवा वाशी,बेलापूर पनवेल ह्या मार्गावर काहीतरी अडथळा आलेला असावा असे वेगवेगळे तर्क लावत होते.
हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत होते. शुक्रवारी रात्री अकरा नंतर पुन्हा पनवेल ते रेल्वे सेवा सुरळीत झाली. पनवेल-सीएसएमटी जाणाऱ्या लोकल या रात्री अकरा नंतर सुरळीत चालू झाल्या.
प्रवाशांना मनस्ताप
मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल दीड तास खोळंबा झाल्यानं मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं समोर आलं. पनवेल ते सीएसएमटी दरम्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. प्रवाशांनी सेवा कधी सुरु होणार याबाबत देखील मोटरमनला वारंवार विचारणा केली.