उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारामती प्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षाला मदत करण्याची तयारी ठेवा, अशा सूचना शिवसैनिकांना दिल्या.
इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष उमेदवार देईल तर नागपूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला मित्र पक्षाला बळ द्यावा लागेल, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी तयारी करावी आणि आपला पक्ष सुद्धा या लोकसभा मतदारसंघात वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितलं आहे.
कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढणार?
रामटेक मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून कृपाल तुमाने विजयी झालेले आहेत. २०१४ आणि २०२१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. आता या मतदारसंघात कृपाल तुमानेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेसची ताकद मिळणार आहे, त्यामुळं या मतदारसंघात कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढू शकतात. या मतदारसंघातील दोन आमदार काँग्रेसचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तर उर्वरित आमदार भाजपचे आहेत. त्यामुळं कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढणार की ते सलग तिसऱ्यांदा विजयी होत लोकसभेत पाऊल ठेवणार हे पाहावं लागेल.