लोकाभिमुख योजनांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

लोकाभिमुख योजनांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. २५ (जि. मा. का.) : केंद्र व राज्य शासनामार्फत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या लोकाभिमुख योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या लाभांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावत आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत निमणी – नेहरूनगर – येळावी या रस्त्याच्या दर्जोन्नती कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. निमणी येथे झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार रवींद्र  रांजणे, गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, निशिकांत पाटील, निमणीच्या सरपंच रेखा पाटील, नेहरूनगरच्या सरपंच ऋतुजा जाधव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जल जीवन मिशन योजनेमुळे घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत १२ हजार रुपये देण्यात येत असल्याने याचा त्यांना आधार मिळत आहे.  जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने टंचाई परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असली तरी नदी व धरणातील उपलब्ध पाणी साठा याचे योग्य नियोजन करून पिण्यासाठी व शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून दिले जाईल.  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मध्ये जिल्ह्यातील १४ रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. या रस्त्याची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.

खासदार श्री. पाटील म्हणाले, शासनाने सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले असून विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. निमणी-नेहरूनगर व येळावी परिसरातील लोकांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता मिळावा यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा ३ मध्ये या रस्त्याचा कामाचा समावेश करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील लोकांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे.

माजी सरपंच आर. डी. पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी अमित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

निमणी ते नेहरूनगर येळावी या ४.८७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दर्जोन्नती कामासाठी ३ कोटी ७३ लाख १८ हजारास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रस्त्याच्या कामामध्ये माती काम, जीएसबी, खडीकरण पहिला व दुसरा थर, डांबरीकरण याचा  समावेश आहे. या बरोबरच या रस्त्यावर 10 मोऱ्या, 100 मीटर बांधीव गटार  आणि 74 मीटर संरक्षित भिंत बांधण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here