आज मुंबईमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली होती. तरीही माझा फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये, असा खुलासा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे. पुतण्या योगेश शिरसागर यांनी अजित पवार गटाची वाट धरली असून जयदत्त क्षीरसागर यांना हा आणखी एक मोठा धक्का असल्याचे जिल्ह्याच्या राजकारणासह नागरिकांत चर्चा होऊ लागली आहे. यातच मुंबईमध्ये योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर हे दाम्पत्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करत आहे. त्यातच बीडमध्ये 27 तारखेला अजित पवारांची सभा होत आहे. या कारणामुळेच मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी, बॅनरबाजीमध्ये योगेश क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो छापत आपल्या जाहीर प्रवेशाचे खुलासा केला असला तरी काकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे .आता यावरून योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशात जयदत्त क्षीरसागर यांचा कसलाही सपोर्ट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट योगेश क्षीसागर देखील संदीप क्षीरसागर यांच्याप्रमाणेच काकांना कंटाळून सत्तेच्या वाटेवर जात आहेत, ्असा संदेश जनतेत गेला आहे.
जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका काय?
गेल्या पंधरा दिवसापासून पुन्हा एकदा क्षीरसागर करण्यात काका पुतण्या आमने-सामने येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चेनंतर काका जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली होती. मागील पन्नास वर्षे जिल्ह्यातील जनते ने आणि माझ्या जिवलग कार्यकर्त्यांनी राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले अशा जिवाभावांच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. आपण कधीही राजकीय स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही. जनतेचा कौल असेल तोच आपला राजकीय निर्णय, अशी भूमिका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बोलून दाखवली होती.