मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथील राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम घरातून कोणालाही न सांगता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याची शोधाशोध सगळीकडे सुरू होती. त्याचा ठावठिकाणा कुणीकडेच लागला नव्हता. अखेर १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुहागर पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू होता. तसेच गावातील आणि वाडीतील ग्रामस्थही त्याचा शोध घेत त्याचा ठावठिकाणा लागतो का यासाठी प्रयत्न करत होते. राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे याचे चार-पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरी पत्नी आणि तो असे दोघांचे कुटुंब होते. या दुर्दैवी घटनेने त्याची पत्नी, नातेवाईकांना आणि गावातील ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही शोध मोहीम सुरू असतानाच वडद गावातील जंगलात सारंग या ठिकाणी कुंभाच्या झाडाच्या फांदीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत पाहून अनेकांच्या पायाखाली जमीन सरकली. या सगळ्या घटनेची माहिती तात्काळ गुहागर पोलिसांना देण्यात आली. गुहागर पोलीस ठाण्याचे हनुमंत नलावडे, विजय साळवी आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला. गुहागर पोलिसांनी पंचनामा कार्यवाही केल्यानंतर जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या सगळ्या दुर्दैवी घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.