अमरावती कारागृहात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी

अमरावती कारागृहात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व स्तरातील शुरवीर देशभक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता. या लढ्यात आपले सर्वस्व झोकुन देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना अमरावतीच्या मध्यवती कारागृहात कारावास भोगावा लागला. त्या स्मृती स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण प्रकाशमान करीत आहोत.

 

मंगळवारी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारत देशवासी हा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप म्हणून साजरा करीत आहेत. “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत देशभर स्वातंत्र्य लढ्यातील शुरवीरांना नमन करण्याबरोबरच विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन समारंभ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आणि त्यांच्याप्रती आदराची भावना आजही भारतीयांच्या मनात खोलवर कोरल्या गेलेली आहे. अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्य संग्रामाच्या इ.स. 1930 ते 1944 या काळात 51 स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, डॉ. शिवाजीराव पटवर्धन या मान्यवरांचाही समावेश होता. ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. 9 ऑगस्ट 1942 च्या ‘चलो जाव’चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याचे स्फुल्लिंग पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिश शासनकर्त्यांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील दोन बराकी आजही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या स्मृतिंना उजाळा देतात. अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल 51 जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते आहे. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून या स्मृतिस्थळाचे पूजन केले जाते व थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले जाते. यावर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजीच्या पुजनासाठी व स्मृतिस्तंभास आदरांजली वाहण्यासाठी कारागृह प्रशासनाने तयारी केली आहे.

अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात 1930 ते 1944 या कालावधीत 51 स्वातंत्र्यसंग्राम सेनानींना कारावास झाला होता. त्यावेळी येथील दोन बराकीत स्वातंत्र्यसेनानींना ठेवण्यात आले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजतागायत या दोन्ही बराकी स्वातंत्र्यसंग्राम लढ्याच्या स्मृती म्हणून सुव्यवस्थित ठेवल्या जातात. या कारागृहात 51 स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी कारावास भोगला, त्यांची नावे स्मृतिस्तंभावर नोंदवून ठेवण्यात आली आहेत. ती नावे पुढीलप्रमाणे आहेत. एम. पल्लम राजू, के.आर. कारंथ, के.पी. अग्नेश्वरिया, के. सुब्बाराव, सी.एन.एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपथीराव, के. कलेस्वामी राव, आर.सी. भारती, सी. चट्टेयार, के.के. रेड्डी, एम.बी. नायडू, एम. अनंतशय्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के.ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस.एस. कुलकर्णी, व्ही.व्ही.गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, टी. प्रकाशम, एम.भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, अब्दुल हसन शेख गुलाम वीर वामनराव जोशी, पी.बी. सदातपुरे, कांताबेन रतनलाल, रामदयाल गुप्ता, रतनलाल बापूजी जैन, पंडित द्वारकाप्रसाद मिश्र, एम.व्ही. अभ्यंकर, शिवाजी पटवर्धन, संभाजी गोखले, पु.का. देशमुख, दिनकर कानडेशास्त्री, डी.बी. सोमण, जी.जी. भोजराज, जी.बी. खेडकर, नीळकंठ मुरारी घटवाई.

स्वातंत्र्यसंग्राम लढ्याच्या स्मृतिस्थळाचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी राष्ट्रीय दिनाचे औचत्य साधून येथे पूजन करून स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्य लढ्यानिमित्त आजही “जैसे थे” जोपासल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यसंग्राम काळातील स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृती जागविणाऱ्या  अशा घटना घडामोडी आजच्या पिढीला नेहमी आपल्या देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्यास किंबहुना ती अधिक घट्ट करण्यास सतत प्रेरणा देत राहतात. स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी शुरवीरांना त्रिवार वंदन!

 

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here