नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 24 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील कुठल्याही आदिवासी भागात नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ष 2023-24 च्या नवीन विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी आयोजित स्वागत समारंभात संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी,शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील बहुविध प्रकारचे रुग्ण,आजार आणि आरोग्य क्षेत्रातील खरी आव्हाने आदिवासी दुर्गम भागात पहावयास मिळतात. अशा ठिकाणी आपल्या करिअरची सुरूवात नवोदित डॉक्टरांनी केल्यास त्यांच्या भविष्यातील वाटतालीस हा दुर्गम भागातील अनुभव पाथ फाईंडर ठरू शकतो. शैक्षणिक कालखंडात जे शिकता येत नाही, जे शिकवले जात नाही असे वैविध्यपूर्ण व आजार आणि रुग्णांवर उपचार करण्याचे कृतीशील शिक्षण या भागात मनापासून काम करणाऱ्या डॉक्टरांना  मिळत असते. तसेच नवोदित डॉक्टरांच्या सोबत अनुभवी डॉक्टरांनी आपली सेवा दिल्यास जुन्यांचा अनुभव  आणि नव्यांच्या ज्ञानातुन  प्रभावी उपचारांची एक नवी साखळी आदिवासी, दुर्गम भागात आरोग्याच्या क्षेत्रात निर्माण होवू शकते व त्यातून या भागातील आरोग्याच्या प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी मदत होवू शकते. नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाचा सांधा बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आजच्या 25 वर्षांपूर्वी इथल्या आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील समस्या वेगवेगळ्या होत्या.  धुळे हे जिल्ह्याचे मुख्यालय होते, तेथून धडगाव, मोलगी सारख्या भागात उपचारासाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोहचताना दळणवळणाच्या सुविधांअभावी संध्याकाळ अथवा रात्र होत असायची. पोहचल्यानंतर तिथे विद्युत प्रवाह असला तर ठिक, नाहीतर अंधारात जमेल त्या परिस्थितीत रुग्ण तपासावे लागत होते. आज मात्र, दळणवळण, वीज पुरवठा, आणि आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करण्यात शासनाला मोठे यश लाभले आहे. या यशाचा पाया पंचवीस वर्षांपूर्वी जिल्हा निर्मितीच्या माध्यमातून शासनाने रचला आहे, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रत्येक शासकीय विभागाच्या निर्माण झालेल्या इमारती आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या सुविधा हा त्याचा कळस आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आवश्यक त्या इमारतींसोबत वसतीगृहांच्या निर्मितीवरही येणाऱ्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. आवश्यक साधनसामुग्रीसोबत आवश्यक सेवा,सुविधा वैद्यकीय महाविद्यालय, विग्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व पवार, डॉ. तृप्ती रामटेके, डॉ. श्रीनिवास चित्ते, डॉ. आशिष रडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रक्तदान व त्यासाठी समाजप्रबोधन करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

0 0 0

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here