चंदगड तालुक्यातील कानूर धनगरवाड्यारील पल्लवी भागोजी झोरे (वय वर्ष २०) ला सोमवारी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्याने रात्री पावसातच केवळ रस्ता नसल्यामुळेच घोंगड्याच्या झोळीत घालून चौघांनी धरून पायवाटेने जंगलातून मध्यरात्री प्रसुतीसाठी चार किलोमीटर घेऊन जाव लागलं आहे.
धनगरवाडा म्हटलं की समोर येतोय घनदाट जंगल सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर रांगा आणि या दऱ्याखोऱ्यात वसलेले वाडे. सायंकाळी सहा वाजले की वेगवेगळ्या पशु पक्षांचे आवाज कधी गव्यांचे हंबरणे, तर कधी कोल्ह्याची कोल्हे कोई, तर कधी कधी बिबट्याचा आवाज, असाच एक चंदगड तालुक्यातील कानूर येथील धनगरवाडा. याच धनगर वाड्यावर सोमवारी (२० ऑगस्ट) रोजी रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान पल्लवी भागोजी झोरे हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या.
खरंतर कोणत्याही धनगर वाड्यावर एखादा रात्रीचा आजारी पडला किंवा एखाद्या महिलेस प्रसव काळा सुरू झाल्या तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी या धनगरवाड्यावर साधा रस्ता नाही, ना आरोग्य केंद्र, ना अंगणवाडी शाळा. कोल्हापूर शहरापासून सर्वसाधारणपणे दीडशे किलोमीटर दूरवर असलेल्या कानूर या गावापासून नऊ किलोमीटर जंगलात चालत जावं लागत. अवतीभोवती घनदाट जंगल, अशातच पल्लवीला रात्री बारा वाजता प्रसुतीकळा सुरू झाल्या, परंतु आता करायचे काय? हा सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला रुग्णवाहिकेला फोन केला. जोपर्यंत रस्ता आहे तिथेपर्यंत येऊन थांबतो म्हणून त्याने सांगितले.
अखेर अवघडलेल्या पल्लवीस झोळीत घोंगडी अंथरुन त्यावर तिला झोपवले. चारी बाजुला चौघांनी धरुन धोकादायक प्रवास सुरू झाला. वरून धो-धो पाऊस पडत होता. पावसातच काळोखात किर्य झाडीतून पायवाटेने यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी कोडिबा येडगे, चिचु येडगे, कविता येडगे जयश्री झोरे भागोजी झोरे (नवरा) कोडिबा झोरे, सासरे धोंडाबाई झोरे सासु या सगळ्यांचा पल्लवीस घेऊन प्रवास सुरू झाला वेदनेने पल्लवी विव्हळत होती. अशातच अंदाजानं पावले टाकीत बॅटरीच्या उजेडात चार किलोमीटर रात्री साडेतीन वाजता धनगर वाड्यावरील बांधव चालत रस्तावर पोहोचवले.
रुग्णवाहिका येऊन रस्त्यावर थांबली होती. तिला रुग्णावाहिकेतून चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिची प्रसूती झाली. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. आज आपला देश चंद्रावर पोहोचला पण एक रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचवण्यास अपयशी ठरली आहे. खरं तर जिथं रस्ता नाही तेथे आपत्कालीन व्यवस्था काय..? हा प्रश्न मात्र स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनीही अनुत्तरितच राहिला असून राज्यकर्ते करतायत तरी काय असा प्रश्न वारंवार अशा घटना मधून समोर येत आहेत.