मुंबई, दि 2 : नागरी भागाचा विकास करताना पायाभूत सोयी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात याव्यात. मल:निस्सारण केंद्र उभारणी, नाल्यांचे प्रदुषित पाणी एकत्रित करून संकलनासाठी वाहिन्या, जलपर्णी निर्मूलन या संदर्भातील कामांना गती देण्यात यावी. स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.
नगरविकास विभागाच्या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती व आगामी कामांची रुपरेषा याबाबत चर्चा झाली.
नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या यशस्वी कामांची माहिती तसेच प्रगतीपथावरील कामकाजाचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा पुरविणे, पूल बांधणे, रस्ते विषयक कामकाज, पाणीपुरवठा, सोशल कल्चरल सेंटर उभारणे, एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी उभारणे, क्रीडा संकुल, नगर रचना योजनांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणे, अर्बन ग्रोथ सेंटरमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते विकसित करणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, तलाव सुशोभीकरण, रस्ते चौपदरीकरण, मल्टीमोडल हब विकसित करणे, गृह योजना प्रकल्प उभारण्यासंदर्भातील कामांचाही यावेळी आढावा घेतला.
सांताक्रझ-चेंबूर लिंकरोड, मुंबईच्या धर्तीवर ठाणे येथे तयार करण्यात येणाऱ्या कोस्टल रोडबाबत तसेच नगरविकास विभागाच्या इतरही प्रकल्पांबाबतही चर्चा झाली.
‘एमएमआरडीए’चे सह आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ‘एमआयडीसी’च्या मुख्य नियोजक सुलेखा वैजापूरकर उपस्थित होते.
००००
श्रद्धा मेश्राम/स.सं