मुंबई, दि.४: सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृह येथे चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग ही खरोखरच हिमालया एवढी बाब आहे. पस्तीस वर्ष सलगपणे मनोज जोशी हे चाणक्यांची भूमिका करत आहेत. लोकांपर्यंत आर्य चाणक्य यांचे काम ते पोहोचवत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जोशी यांनी नाटक आणि चित्रपटातून दर्जेदार अभिनय केला. चाणक्य नाटकाच्या प्रयोगातून एक प्रकारे त्यांची आराधना त्यांनी केली. एक प्रकारे राष्ट्रीय कार्यच श्री. जोशी यांनी केले. आर्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शक. त्यामुळे जोपर्यंत आपल्या पिढ्या हे विचार अंगिकारत राहील, तोपर्यंत या देशाला, येथील संस्कृती, परंपरेला धोका नाही, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.
000