विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यावे- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद

विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यावे- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद

पुणे दि.२८: कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने बार्टीने विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यावे, त्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे आयोजन करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे आयोजित समाज कल्याण विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख स्नेहल भोसले, उमेश सोनवणे, रवींद्र कदम,शुभांगी पाटील आणि समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी बार्टीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संस्था राबवित असलेले अभ्यासक्रम व प्रशिक्षण, समाज कल्याण विभागातील रिक्त पदे यांचा आढावा घेतला.

समाज कल्याण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती या वेळेतच विद्यार्थ्यांना मिळाव्यात, शिष्यवृत्ती पासून कोणी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, मागासवर्गीय समाजाला हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी रमाई योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना विना विलंब मिळावे यासाठी सुलभ कार्यपद्धती राबवावी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळेल याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही श्रीमती मिसाळ यांनी केली.

बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी बार्टीच्या कामकाजाची तसेच राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रम याची माहिती दिली.  बैठकीला बार्टी तसेच समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here