लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. २८ (जिमाका):  सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकांना  मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृद्ध लोकशाही अधिक मजबूत, बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदवावे व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावस्तरावर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देखील मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. दि. ९ डिसेंबर पर्यंत नवमतदारांना या यादीत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही अशांनी तसेच नवमतदार तरुण, तरुणींनी यादीत नोंदणी करून लोकशाहीच्या प्रक्रियेतील भाग बनण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

प्रशासनाच्यावतीने दि.९ डिसेंबर पर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती व दावे मागविण्यात आले आहे. त्यानुसार नवमतदारांना मतदार नोंदणीसह यादीतील नावांमध्ये बदल, दुरुस्ती असल्यास करता येणार आहे. नाव नोंदणीसाठी नवमतदारांना नमुना क्रमांक ६ भरावयाचा आहे. मतदार मयत झाला असेल तर नांव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तसेच यादीतील आपले नाव, जन्मतारीख, पत्ता आदींच्या दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ मतदारांना भरावयाचा आहे. संबंधित मतदार आपल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नमुने भरून सादर करू शकतात.

मतदारांच्या मतदानामुळे लोकप्रतिनिधी किंबहूना सरकार निवडले जात असते. त्यामुळे मतदानाला फार महत्व आहे. देशाच्या राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा दिलेला हा फार मोठा हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादीत नोंदणी गरजेचे असून नवमतदारांनी यादीत नावाची नोंदणी करून घ्यावे. नावात बदल, दुरुस्ती, आधार नोंदणी तसेच नवीन लग्न झालेल्या मुलींनी आपली नोंदणी करून मतदानाच्या अधिकाराचा हक्क बजावावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

आगाऊ मतदार नोंदणीची सुविधा

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने सद्या राबविण्यात येत असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रमांतर्गत दि. १ जानेवारी २०२४ किंवा त्याआधी वयाची १८ वर्षे पुर्ण करणाऱ्या नवमतदारांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच सन २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या दि. १ तारखेला १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना देखील आगाऊ नाव नोंदणी करता येईल. तरुण-तरुणींची नोंदणी करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले आहे.

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here