मुंबई, दि. ११ :- जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रीय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पश्चिम घाटासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अहवालामुळे या क्षेत्राच्या संवर्धनासाठी शासनासह लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना उभारी मिळाली आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पुरस्कारामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, क्षारपड जमिनींचे वाढतं प्रमाण यासारख्या समस्यांवर संशोधन, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या जागतिक पुरस्काराबद्दल डॉ. माधव गाडगीळ यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भविष्यातील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
***