नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मध्य भारतातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा असणाऱ्या कॉफी टेबल बुक’चे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
कार्यक्रमाला ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक व कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे सल्लागार संपादक पंकज माणिकतला, लोकमतचे संचालक अशोक जैन,आशिष जैन, आसमान शेठ आदी उपस्थित होते.
इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात लहान-लहान गोष्टींचे डॉक्युमेंटेशन केले. त्यातूनच इतिहास लिहिला गेला. मात्र, आपला भूतकाळ वैभवशाली असूनदेखील आपल्याला युरोप व चीनच्या प्रवाशांनी लिहिलेला इतिहास शिकवावा लागतो. देश प्रगतिपथावर नेताना समाजातील सकारात्मक बाबींचे दस्तऐवजीकरण आवश्यकच आहे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळते.
समाजातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षवेधी काम करतात. मात्र, हे कार्य अनेकदा त्या क्षेत्रापुरते किंवा काही लोकांपुरते मर्यादित राहते.समाजातील सर्व क्षेत्रातील कार्य सर्वापुढे आले पाहिजे. छोट्या छोटया प्रयत्नातूनच परिवर्तन घडत असते. परिवर्तनाचे हे साहित्य दस्तऐवजीकरणातून समाजापर्यंत पोहोचते. अशा लहान प्रयत्नांतूनच देश मोठा होतो, असे फडणवीस म्हणाले.
नागपूर, इंग्रज काळापासून मध्य भारताचे महत्त्वाचे केंद्र होते. नागपूरने सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, विज्ञान व सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन आयकॉन दिले आहेत. मध्यभारतातील गुणवान लोकांचे हे दस्तऐवजीकरण या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी देखील संबोधित केले तर या कार्यक्रमामागील भूमिका विजय दर्डा यांनी मांडली. तर प्रास्ताविक आस्मान शेठ यांनी केले.
०००