हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2024-25 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 167 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 171 कोटी 49 लाख 5 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली  होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 171 कोटी 49 लाख 05 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 338 कोटी 49 लाख 05 हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली.

वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्याचे अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, राजू नवघरे, सतीश चव्हाण, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव एन.आर. गद्रे,  जिल्हाधिकारी  जितेंद्र  पापळकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्याचा सकारात्मक जीडीपी वाढ ही आनंदाची बाब असून खात्यावर असलेला उपलब्ध निधी त्वरित खर्च करावा तसेच निवडणूक आचारसंहिता ग्रहित धरून खर्चाला प्राधान्य देवून सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सरकारचा पैसा योग्य ठिकाणी, दर्जेदार कामे होण्यासाठी खर्च करावा.  तसेच प्रधानमंत्री महत्वकांक्षी योजना व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त निधी खर्च करण्याला प्राधान्य द्यावे.  केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. हिंगोलीचा आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेली औळख पुसण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा चालू वर्षाचा शंभर टक्के निधी खर्च करावा. श्री संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रासाठी निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, निती आयोगाने अकांक्षित जिल्हे व तालुके या सर्व बाबींचा विचार करुन जास्तित जास्त निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यस्तरीय आयोजित ऑनलाईन बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा राहिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणताही निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विनंतीनुसार मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यापूर्वी जास्तीचा वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री  अब्दुल सत्तार यांनी  हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच शहरांचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली.

यावेळी नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांनी राज्याचा विकास करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार केलेला आहे. या विकास आराखड्यातील कामासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा निधीचा वापर करावा व निधी कमी पडत असल्यास जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वापरावा. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा वापर करुन जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळवावा आणि सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्मार्ट शाळा, स्मार्ट गावे निर्माण करावीत. सन 2022-23 चा अखर्चित निधी व चालू वर्षाचा निधी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे खर्च करावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचे बांधकाम, वर्गखोल्यांची  दुरुस्ती, नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम, आदर्श शाळामध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, उपकेंद्र इमारत बांधकाम, आयुर्वेदिक, युनानी दवाखान्याचे बळकटीकरण, शासकीय कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम, रस्ते विकास, लघुपाटबंधारे बांधकाम व दुरुस्ती, कोल्हापुरी पध्दतीचे बंधाऱ्याचे बांधकाम व दुरुस्ती, अपारंपारिक ऊर्जा विकास, नगरविकास आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी आवश्यक अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले. तसेच श्री संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच नाविन्यपूर्ण योजनेत जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना क्षमता बांधणी करण्यासाठी अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोटा,आंधप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा लाभ दिला आहे. तसेच विविध शाळेस रोबोटिक्स व कोडिंग लॅब बसविण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण योजना राज्याच्या योजनेत समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here