लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनास तीन हजार पेक्षा अधिक अभ्यागतांची भेट

लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनास तीन हजार पेक्षा अधिक अभ्यागतांची भेट

नागपूर,दि.20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनास अधिवेशनात येणाऱ्या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व सर्वसामान्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवासापर्यंत सुमारे तीन हजार पेक्षा अधिक अभ्यागतांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 16 डिसेंबर रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाकडे बहुतेकांची पाऊले वळली. आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आलेले दुर्मिळ लोकराज्य अंक, येथे उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरला.

यावेळी बहुतेकांनी या प्रदर्शनाची पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली. भेट देणाऱ्यांमध्ये राज्य मंत्री, ॲड. आशिष जायस्वाल, आमदार सर्वश्री प्रविण दरेकर, चित्रा वाघ, अमोल मिटकरी, बाबुसिंग राठोड, अबु आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे आदी लोकप्रतिनिधींनी पहिल्याच दिवशी या प्रदर्शनास भेट दिली. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वन विभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग,अपर आयुक्त आदीवासी विभाग रविंद्र ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास पहिल्याच दिवशी भेट दिली.

भेट देणाऱ्या अभ्यागतांनी प्रदर्शनातील विविध अंक चाळून आपले बहूमुल्य अभिप्रायही नोंदविले. अभिप्राय नोंदविणाऱ्यांमध्ये प्रातिनिधीकरित्या आमदार सर्वश्री चित्रा वाघ, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रवीण स्वामी, माजी आमदार प्रकाश गजभिये, विधानसभा निरिक्षक रवींद्र महाडीक, दै. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, लोक कलावंत प्रा. दिलीप अलोणे आदींचा समावेश आहे. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते.

प्रदर्शनात 1964 पासूनचे लोकराज्य अंक लावण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविद्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक याठिकाणी लावण्यात आले आहेत.

0000

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here