‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी

मुंबई, दि. 9 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता.

शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. केसरकर दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी सुसंवाद साधतात. दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजीच्या या कार्यक्रमात धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या रहिवासी कु.शुभांगी शशिकांत कदम यांनी पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत विनंती अर्ज केला होता. याची मंत्री श्री.केसरकर यांनी विशेष बाब म्हणून तातडीने दखल घेऊन ही अडचण दूर करण्याचे आदेश विभागाला दिले. दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तांत्रिक अडचण दुरुस्तीबाबत अधिसूचना जारी करून अर्ज करण्यास आणखी काही दिवस मुदतवाढ देण्यात आली. याबद्दल कु. कदम यांनी मंत्री श्री.केसरकर आणि तत्पर शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

सन 2017 मध्ये शासनामार्फत पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये कु.कदम यांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये होते. या यादीतील उमेदवारांची आता निवड करण्यात येत असून पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते. यामुळे त्या निराश झालेल्या असताना त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री या नात्याने श्री.केसरकर यांना पवित्र पोर्टल बाबत विनंती अर्ज केला. विशेष म्हणजे त्या स्वत: उपस्थित नसतानाही श्री.केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन दिलासा दिल्याबद्दल शुभांगी कदम यांनी आभार व्यक्त केले आहेत.

शासन आपल्या दारी संकल्पनेचे स्वागत करून राज्य शासनाने जनता दरबाराची संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवावी, जेणेकरून त्यांच्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना आपल्या अडचणी शासनासमोर मांडता येतील आणि त्यांना तातडीने दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शुभांगी कदम यांनी व्यक्त केली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here