मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्तवाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपट आणि रंगमंच क्षेत्रातील कलावंतांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
टिव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप – मराठी टिव्ही आणि फिल्म अवॉर्ड्स २०२३’ मधील प्रमुख पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कलावंत आणि विजेत्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कलावंत हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका निभावतात. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. टिव्ही ९ हे देशातील मोठे नेटवर्क आहे. टिव्ही ९ चा हा पहिलाच पुरस्कार सोहळा असून त्यात मराठी कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी टीव्ही ९ चे अभिनंदन केले.
मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी लोकांनी कलात्मकता आणि सर्जनशीलता जपली असून मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. टिव्ही ९ ने साधलेल्या प्रगतीचे कौतुक करून बायोस्कोप ला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टिव्ही ९ ने त्याच नावाने आपले पहिले पुरस्कार देण्याची सुरूवात केल्याबद्दल त्यांनी टिव्ही ९ नेटवर्कचे अभिनंदन केले. मराठी चित्रपटांनी आपला दर्जा कायम राखला असल्याचे सांगून त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे यावेळी अभिनंदन केले.
प्रारंभी टिव्ही ९ नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक बरूण दास यांनी प्रास्ताविकाद्वारे आपल्या वाहिनीची भूमिका मांडली.
यावेळी ‘सुभेदार’ या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर अभिनेता रितेश देशमुख यांना ‘वेड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘वाळवी’ चित्रपटातील भूमिकेसाठी शिवानी सुर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर सुभेदार चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. मालिका विभागामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा, सचिन गोखले यांना याच मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तसेच जुई गडकरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘जय जय स्वामी समर्थ’ साठी अक्षय मुडावदकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
०००