अग्निशमन दिलानं दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधून पाच जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही आग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागली होती. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरु केलं. इमारतीमध्ये जे लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
अग्निशमन दलाच्यावतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास आग लागली. यानंतर ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. सांताक्रुझ पूर्वमधील विमल गुप्ता रोडवरील प्रभात कॉलनीतील बीएमसीच्या कार्यालयाजवळील गॅलेक्सी हॉटेलला आग लागली.
या आगीच्या घटनेत पाच जण भाजले होते. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुपल कनजी वय वर्षे २५, किशन एम २८ वर्षे, कांतिलाल गोरधन वारा ४८ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, अल्फा वखारिया १९ वर्षे आणि मंजुळा वखारिया ४९ वर्षे या जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार या आगीत इलेक्ट्रीक वायर, एसी यंत्रणा, पडदे, फर्निचर जळून खाक झालं आहे. रुम नंबर १०३ आणि २०३ मध्ये आग लागली. तिसऱ्या मजल्यावर इतर वस्तू देखील आगीत जळून खाक झाल्या. याशिवाय आग चौथ्या मजल्यावर देखील पोहोचली होती. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणानं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.