आदिवासीबहुल सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासीबहुल सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.३१ : नाशिक जिल्ह्याच्या आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार नितीन पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्यप्रणालीद्वारे), नाशिकचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ गीते आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सुरगाणा हा आदिवासी दुर्गम तालुका आहे. केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या आकांक्षित (मागास) तालुका कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून तालुका, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढवावा लागेल. येथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल.

जलसंधारण विभाग, आदिवासी विकास विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सुरगाणा, कळवण तालुक्यातील विविध लघु पाटबंधारे योजना तातडीने पूर्ण कराव्यात. काही सिंचन योजनांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे, तर बऱ्याच योजनांना पाणी वापर प्रमाणपत्र मिळाले आहे. या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

आदिवासी तालुक्यांतील अप्पर पुनद, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, वाघधोंड, उंबर विहीर, सालभोये, सिंगलचोंढ या लघु पाटबंधारे योजना तसेच विविध पाझर तलाव लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here