कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विधी विधान इंटर्नशिप’; १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विधी विधान इंटर्नशिप’; १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 30 :- विधी व न्याय विभागातील ‘विधी विधान शाखा’ ही राज्याच्या कायद्यांचे मसुदे तयार करण्यासाठी विशेष स्वतंत्र शाखा म्हणून स्थापन करण्यात आली आहे. या शाखेत कायदे तयार करणे, कायद्यांमध्ये सुधारणा करणे, अध्यादेश प्रख्यापित करणे, विधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धती, अधिनियम आणि नियम तयार करणे, अधिसूचना करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, त्यांच्या कार्य क्षेत्रातील करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यादृष्टीने विधी व  न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरिता सहा आठवड्यांचा इंटर्नशीप उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हा उपक्रम १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत sec.legislations maharashtra.gov.in  या ई-मेलवर अर्ज पाठवावा.

      विद्यार्थ्यांच्या निवडी संदर्भात निकष

शैक्षणिक अर्हता :- इंटर्नशीप उपक्रम राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त विधी महाविद्यालय किंवा विधी विद्यापीठातून विधी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे.

पाच वर्षाचा विधी पदवी अभ्यासक्रम :  चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी.

तीन वर्षाचा विधी पदवी अभ्यासक्रम, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी. विधी पदव्युत्तर पदवी, पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची पद्धत

इंटर्नशीपसाठी अर्ज विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाकडे किंवा विद्यापीठाकडे विहित नमुन्यात करावयाचा आहे. महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने त्यांना प्राप्त झालेल्या अर्जांपैकी जास्तीत जास्त दोन अर्ज ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे.

इंटर्नशीप उपक्रमाची रूपरेषा

या इंटर्नशीप उपक्रमामध्ये शासनाच्या कामकाजाबद्दल माहिती, विधेयकांचे व अध्यादेशाचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धती, अधिनियमाखालील नियम व अधिसूचना तयार करण्याची, बनविण्याची कार्यपद्धती, विधानमंडळात विधेयक पारित करण्याबाबतची कार्यपद्धती, विधी विधान शाखेतील अधिकारी, विधी विधान, दुय्यम विधी विधान तसेच इतर संबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती देतील. विविध प्रकारचे कायदे व त्यामधील विशिष्ट प्रकारच्या तरतुदीबाबतची माहिती, संविधानातील कायदेविषयक तरतुदी, त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याबाबतची माहिती, विधी विधानांच्या कामकाजाबाबत संबंधित कार्यालयाला भेटी देणे इत्यादीचा समावेश असणार आहे. इंटर्नशीप कार्यक्रम मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील  विधी व न्याय विभागाच्या कार्यालयात घेण्यात येईल. या इंटर्नशीप उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही मानधन, भत्ता किंवा खर्च देय असणार नाही. विद्यार्थ्यांना राहण्याची सोय स्वतः करावी लागेल. निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर निर्देशित केलेल्या ठिकाणी विहित मुदतीत विद्यार्थ्यास स्व-खर्चाने हजर व्हावे लागेल.

या संदर्भातील आदेश 28 नोव्हेंबर 2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत.

0000

मनीषा सावळे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here