मलनि:सारण विभागाचे मुंबईत ७४ हजार, तर पर्जन्यजलवाहिन्या विभागाच्या २५ हजारांहून अधिक मॅनहोल आहेत. हे मॅनहोल संरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. दीड वर्षात मॅनहोलची झाकणे चोरीला जाणे किंवा ते नसणे, झाकण खराब होणे किंवा तुटणे इत्यादी दुरावस्था होत आहे. मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्यावर थेट गुन्हा दाखल करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या सुनावणीत उघडे मॅनहोलसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले. त्यानंतर मुंबई महापालिकेने मॅनहोल झाकल्याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्यास उच्च न्यायालयानेही पालिकेला सूचना केली असून कृती आराखडा तयार करण्याच्याही सूचनांचा यात समावेश आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण विभागाने स्टेनलेस स्टील, फायबर आणि डक्टाइल जाळ्या बसवण्याचे नियोजन केले आहे. तिन्ही प्रकारांतील १०० जाळ्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर भागातील मलनि:सारणच्या अखत्यारीतील मॅनहोलवर बसवण्यात येणार आहेत. या १०० जाळ्यांसाठी निविदा काढून त्या बसवण्यासाठी कार्यादेशही जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील आठवड्यापासून या जाळ्या बसवण्यास सुरुवात केली जाईल. हे काम साधारण दोन आठवड्यांत पूर्ण केले जाणार आहे. नवीन प्रकारातील १०० जाळ्यांचा आढावा घेतल्यानंतरच उर्वरित मॅनहोलवर जाळ्या बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील एकूण मॅनहोलपैकी साधारण साडेसहा हजार मॅनहोलवर साध्या प्रकारातील धातूच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
संयुक्त पाहणी पूर्ण
मुंबईतील मॅनहोल झाकल्याची संयुक्त पाहणी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांतील सहायक आयुक्त आणि न्यायालयाकडून नियुक्त वकिलांकडून पूर्ण करण्यात आली आहे. २९ सप्टेंबरच्या आधी हा पाहणी अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यावेळी नव्या १०० संरक्षक जाळ्या बसवण्यासंदर्भातील माहितीही न्यायालयाला देण्याचा पालिकेचा विचार आहे.