महाराष्ट्र शासन मल्लांच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र शासन मल्लांच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. ९ : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देईल. शासन मल्लांच्या पाठशी असून त्यांनी राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून देत राज्याचा गौरव वाढवावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर आयोजित ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी २०२३-२४ स्पर्धेस भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दीपक पायगुडे, बापूसाहेब पठारे, भीमराव धोंडे, स्पर्धेचे आयोजक प्रदीप कंद, संदीप भोंडवे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्यात नामवंत पैलवान या स्पर्धेतून तयार होतात. देशात महाभारत काळापासून कुस्तीची परंपरा आहे. राज्यालादेखील कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकचे पहिले पदक कुस्तीमध्ये मिळवून दिले. आज मात्र महाराष्ट्राच्या पैलवानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळत नसल्याने कुस्तीगीर परिषदेला त्यासाठी मोठे काम करावे लागेल.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मागील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मल्लांचे मानधान वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हिंद केसरी आणि रुस्तम ए हिंदचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजारावरून २० हजार, वयोवृद्ध खेळाडूंचे मानधन अडीच हजारावरून साडेसात हजार रुपये केले. खुराकाचा खर्च ३ हजारावरून १८ हजार रुपये केला. वेगवेगळी साधने घेता यावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. भविष्यातदेखील राज्य शासन मल्लांच्या पाठीशी उभे राहील, असेही ते म्हणाले.

यावर्षीच्या आशियायी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्याला १ कोटी रुपये पारितोषिक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. कुस्तीसाठीही आवश्यक सर्व सोई शासन करेल. मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक असे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवायला हवे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यासाठी जी मागणी करेल ती शासनातर्फे देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार तडस म्हणाले, या स्पर्धेचे चांगले आयोजन करण्यात आले आहे. ४४ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ९०० कुस्तीगीरांचा विमा कुस्तीगीर संघाकडून उतरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे नाव हिंद केसरी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठे करण्यासाठी शासनाने नोकरी दिलेल्या कुस्तीगीराने नोकरीत प्रवेश केल्यापासून किमान ३ वर्षे खेळले पाहिजे. पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील पैलवान सिकंदर शेख, वाशिम विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ, पुणे या कुस्तीची सलामी लावण्यात आली. या कुस्तीमध्ये सिकंदर शेख विजयी झाला. श्री. फडणवीस यांच्या हस्ते गादी विभागातील पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर विरुद्ध माऊली उर्फ हर्षल कोकाटे, पुणे शहर या कुस्तीचीही सलामी लावण्यात आली. यामध्ये माऊली कोकाटे विजयी झाला.

यावेळी श्री. कंद यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवर, कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here