स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि.30 : दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गंत ‘कचरामुक्त भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख, एक तास’  उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागात सुमारे 56,786 ठिकाणी नियोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले गेले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, खुल्या जागा येथे साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे.  ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह महिला बचतगट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here