तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ३ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी हे नेहमी दुष्काळ असणारे तालुके आहेत. यावर्षी झालेला पाऊस, पिकांची परिस्थिती पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तातडीने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. तरी विशेष बाब म्हणून या सर्व तालुक्यांना दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर २) लागू करून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यामध्ये चालू वर्षी सरासरी पर्जन्‍यमान 62.3 टक्के झाले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा आणि  मिरज या चार तालुक्यांना दुष्‍काळाची दुसरी कळ (ट्रिगर – 2) लागू झालेली आहे. मात्र, तासगांव, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यामध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली नसली तरी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. या तालुक्यात नेहमी अत्यंत कमी पर्जन्यमान होते. तसेच हे नेहमी दुष्काळ असणारे तालुके आहेत. यावर्षी झालेला पाऊस, पिकांची परिस्थिती पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तातडीने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव दि. 26 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्‍त, पुणे यांना सादर करण्यात आला आहे. तरी विशेष बाब म्हणून या सर्व तालुक्यांना दुष्काळाची दुसरी कळ लागू करून तातडीने दुष्काळ जाहीर करणेबाबतचे आदेश संबंधितांना द्यावेत, ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here