भाऊसाहेब वाकचौरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील असून प्रशासकीय सेवेत असताना त्यांच्यावर साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आली. सात वर्ष ही जबाबदारी सांभाळताना त्यांचा जनसंपर्क दांडगा झाला. सेवानिवृत्त झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची एक सभा शिर्डीमध्ये झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठी राज्यातील पहिलाच उमेदवार जाहीर केला. २००९ ला जनतेने स्वीकारल्याने भाऊसाहेब वाकचौरे खासदार झाले. मात्र, शिवबंधन झुगारल्याने २०१४ आणि २०१९ ला अपक्ष होते मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
२००४ साली बाळासाहेब विखे पाटील शिर्डीचे खासदार होते. मात्र २००९ ला मतदारसंघ राखीव झाल्याने आघाडी कडून रामदास आठवलेंना उमेदवारी मिळाली. काँग्रेसची ताकद आणि साखर सम्राटांच्या मतदारसंघात पहिल्यांदा उमेदवारी करत असलेल्या वाकचौरेंसाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान करत त्यांना निवडूण आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र २०१४ ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने गद्दारीचा शिक्का त्यांच्यावर लागला. नंतरच्या काळात आक्रमक शिवसैनिकांनी त्यांच्या प्रचारादरम्यान निदर्शने केली. त्यांच्यावर हल्ले झाले अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. असे असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एक मोठा गट त्यांच्यावर नाराज आहे. तर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे शिर्डीत आले असता त्यांनी मंचावरून बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले. बबनराव घोलप यांनी लोकसभा मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्षाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. अशातच भाऊसाहेब वाकचौरेंची एन्ट्री होत असल्याने निष्ठावान शिवसैनिक काय भूमिका घेणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.