आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २० : राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रुपये, मार्गदर्शकास १० लाख रुपये, रौप्य पदक विजत्या खेळाडूसाठी ७५ लाख रुपये, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपये, कांस्य पदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपये, मार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स)सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कास्य पदक विजेत्यास २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

यापूर्वी सुवर्ण पदकासाठी १० लाख रुपये, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये, रौप्यपदकासाठी ७.५ लाख रुपये, मार्गदर्शकास १ लाख ८७ हजार रुपये, कांस्यपदकासाठी ५ लाख रुपये, मार्गदर्शकास १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिकस्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात राज्याच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.पवार यांनी आठ दिवसांपूर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा झाली, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे  मंत्री श्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

00000

राजू धोत्रे/विसंअ

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here