रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

  •  हिंगोली येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता.

  • श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी ६० कोटी ३५ लाख रुपयाच्या आराखड्यास मान्यता.

  • हिंगोली  जिल्ह्यातील  पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा या तीन प्रकल्पाच्या ३ हजार ८४ कोटी ८३ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता.

  • मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान काफी टेब्ल बुकचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विमोचन.

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी  श्री. भुमरे बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर,  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, चित्ररथ, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्या ठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ कळमनुरी तालुक्यातील दाती व वसमत तालुक्यातील वापटी येथे असे एकूण दोन स्मृतीस्तंभ उभारण्यात येत असलयाचे शुभेच्छा संदेशात सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळ्याच्या निमित्त आणि आपल्या देशाच्या मातृभूमीविषयी आणि  वीरांनी  दिलेल्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून, देशात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ हे अभियान जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. भुमरे पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कालच छत्रपती  संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांची  विकास  कामे करण्याचा संकल्प  जाहीर केला आहे. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयास 430 खाटांचे रुग्णालय संलग्नित असेल. यासाठी अंदाजे 485 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी 60 कोटी 35 लाख रुपयाच्या आराखड्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले.

मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्पामध्ये हिंगोली  जिल्ह्यातील  पोटा उच्च पातळी बंधारा, जोडपरळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा यांचा समावेश आहे. या तीन प्रकल्पाच्या 3 हजार 84 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचा  हिंगोली जिल्ह्यातील 4 हजार 219 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे, असेही श्री. भुमरे यांनी सांगितले.

वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा, वसमत एमआयडीसी स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी 33 कोटी 3 लाख रुपये, हिंगोली  शहरासाठी  104 कोटी 28 लाख किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प, औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या पाणीपुरवठा  प्रकल्पासाठी 36 कोटी 44 लाख रुपये, औंढा नागनाथ शहराच्या विकास आराखड्यासाठी  50 कोटी  रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. या हळद संशोधन केंद्रासाठी  100 कोटी रुपयाच्या निधीस मान्यता दिली असून हळद संशोधनास आता वेग येणार असल्याची माहिती श्री. भुमरे यांनी यावेळी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये गोवंश वर्गीय जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत  2 हजार 674 जनावरे बाधित आढळून आलेली आहेत. सद्यस्थितीत 846 सक्रीय पशु रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेऊन तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क करावा व आपल्या जनावराला लम्पी आजारापासून वाचवावे, असे आवाहन श्री. भुमरे यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकीय आरोग्य संस्थामधून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निशुल्क करुन मोफत उपचाराची सोय केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील  सर्वसामान्य जनतेला होत आहे. तसेच देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकंल्पनेतून साकारलेल्या आयुष्यमान भव: मोहिमेची सुरुवात राज्यभर दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी करण्यात आली आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य व्हावे यासाठी आयुष्यमान भव: ही महत्वकांक्षी मोहिम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंत राबविली जाणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये 18 लाख 34 हजार 770 मनुष्य दिन निर्मिती करत   118 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सन 2023-24 मध्ये मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट 15 लाख       95 हजार असताना आतापर्यंत 14 लाख 34 हजार 786 मनुष्य दिन निर्मिती करुन 90 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मंजूर करण्यात आलेल्या 16 हजार 386 वैयक्तीक सिंचन विहिरीपैकी 5 हजार 765 विहिरीचे कामे सुरु करण्यात आली आहेत. तर 6 हजार 647 विहिरींची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या 419 कामांना मंजुरी देण्यात आली असून 184 कामे सुरु झालेली आहेत व 13 कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच 3 हजार 92 गाय गोठ्यांना मंजुरी देण्यात आली असून 2 हजार 147 कामे सुरु झालेली आहेत. तर 330 कामे पूर्ण झालेली आहेत, असे सांगून आपल्या जिल्ह्याची आणि महाराष्ट्र राज्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

प्रारंभी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. भुमरे यांनी  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, माधव हरण, गंगाबाई कावरखे, रुक्मिनीबाई देवकते, मालतीबाई पैठणकर, वच्छलाबाई नाईक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. तसेच श्री. भुमरे यांनी  लोकप्रतिनिधी,  अधिकारी,   पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठवाडा मुक्ती दिनाची व अवयव दानाची शपथ घेण्यात आली. तसेच यावेळी कृषि विभागामार्फत खरीप हंगाम व रब्बी हंगामामधील जिल्हास्तरीय पिक स्पर्धेतील विजेत्यांना रोजगार हमी  योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या क्रार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी   तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान कॉफीटेबल बुकचे

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विमोचन

यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान या काफी टेब्ल बुकचे विमोचन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, संजय टाकळगव्हाणकर, वामनराव टाकळगव्हाणकर, विठ्ठल सोळंके उपस्थित होते. तसेच यावेळी श्री. भुमरे यांच्या हस्ते शिक्षकाची यशोगाथा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here