डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी मिशन मोडवर उपाययोजना करा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी मिशन मोडवर उपाययोजना करा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दि. २ (जिमाका): जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी मिशन मोडवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील चिकनगुनिया, डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांच्या सद्यस्थितीबाबत दुरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मालेगाव मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, नाशिक महानगपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. माधव अहिरे, बायोलॉजिस्ट डॉ. राजेंद्र त्र्यंबके आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे साथीचे आजार पाण्याच्या माध्यमातून पसरतात. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये आपला परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांची शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक ते सर्व उपचार वेळेत उपलब्ध होतील, निर्धारित उपचार पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा. तसेच खाजगी रुग्णालयांसोबत समन्वय साधून तपासण्या व उपचार वेळेत होतील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे.

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथी नियंत्रणात राहण्यासाठी स्वच्छतेसोबतच नागरिकांच्या तपासण्या होणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी ज्या भागांमध्ये संशयित रुग्ण आढळले असतील तिथे सर्वेक्षण करून प्रमुख अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साथीच्या आजारांबाबत नियमित आढावा घेऊन त्याविषयी सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिल्या. तसेच या आजारांवरील उपचारासाठी लागणारी औषधे, तपासणी किट व लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता नियोजन करण्यात आले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येऊन त्याबाबतचा नियमित अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूच्या सात रुग्णांपैकी पाच रुग्ण खाजगी व दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी दिली. तर ग्रामीण भागात मलेरियाचे दोन रुग्ण असून ते घरीच उपचार घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here