तत्पूर्वी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत पियुष गोयल यांची भेट घेतली. या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर गोयल यांनी केंद्र सरकारमार्फत कांदा खरेदी होणार असल्याची घोषणा केली. धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीत धाव घेत धावपळ केल्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर तोडगा निघेल, असे वाटत होते. मात्र, त्यापूर्वीच जपानमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मास्टरस्ट्रोक खेळून राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे कांद्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज सकाळी गोयल यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, ही बैठक संपण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन परस्पर कांदा खरेदीची घोषणा केली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे कांद्याच्या मुद्द्यावर एकहाती तोडगा काढण्याचे धनंजय मुंडे यांचे श्रेय हिरावले गेले. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटावर सरशी करण्याचा प्रयत्न केला का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार: धनंजय मुंडे
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आलाय. या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याबरोबर या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. याबरोबरच राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर आज पियुष गोयल यांच्याबरोबर दुपारी १२ वाजता भेट निश्चित झालीय. निर्यातीवरील शुल्क शेतकर्यांसाठी अन्यायकारक असून याच विषयावर चर्चा केली जाणार आहे. तसेच राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अत्यल्प पाऊस असे चित्र आहे. ज्या भागात पाऊस झालेला नाही, तेथे परतीचा पाऊस न झाल्यास चारा, पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेवून आतापासूनच अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.