कामगारांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ योजनेत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे 

कामगारांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ योजनेत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे 

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत  कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार  कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.

कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात  झाली. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिटूचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव कॉ. भरमा कांबळे, उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम व इतर सदस्य उपस्थित होते.

कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या  विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना ‘मध्यान्ह भोजन’ ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.

मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.

०००००

मनीषा सावळे /विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here