मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटीचा रेल्वेशी सामंजस्य करार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटीचा रेल्वेशी सामंजस्य करार

मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या.

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीट देखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन- नैनुटिया, IRCTC च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सिमा कुमार आदी उपस्थित होते.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here