नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०७ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी  प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३१ व्या सत्राचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here